डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्यात नव्या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ

राज्यात आजपासून नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं अनेक शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी मंत्री, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाळांमधे विद्यार्थ्यांचं स्वागत केलं.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, दुर्वेस इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शाळा प्रवेशोत्सव सोहळ्यात ते सहभागी झाले होते. सातारा जिल्ह्यात कोडोली इथं जिल्हा परिषदेच्या शाळेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यात दौंड इथं जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. सांगली जिल्ह्यात राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या शाळेत जाऊन शाळेच्या पहिल्या दिवसानिमित्त विद्यार्थ्यांचं स्वागत केलं, आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

 

मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी तर नवी मुंबईत आयुक्त कैलास शिंदे यांनी महानगरपालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. रत्नागिरी जिल्ह्यात विविध शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करून विद्यार्थ्यांचं शाळेत स्वागत करण्यात आलं. जिल्ह्यात १० हजार १२१ विद्यार्थ्यांनी पहिलीला प्रवेश घेतला आहे. 

 

धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर नगरपरिषद प्राथमिक शाळेत नवीन विद्यार्थ्यांचं फेटे बांधून, फुलं आणि पेढे देऊन तसंच पावलांचे ठसे घेऊन स्वागत करण्यात आलं. सोलापूर जिल्ह्यातल्या इंगळगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीतल्या विद्यार्थ्यांचं आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते स्वागत करण्यात आलं. यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचं वितरण तसंच शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं.

 

लातूर जिल्ह्यात शाळेच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांचं उत्साहात स्वागत करताना पहिलीतल्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं, गणवेश, बूट आणि मोजे वितरित करण्यात आले. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या पायांचे ठसे घेण्याचा विशेष उपक्रमही राबवला जात आहे.

 

छत्रपती संभाजीनगर इथं पहिल्यांदा शाळेत येणाऱ्या चिमुकल्यांचं औक्षण करून तसंच फुलांची उधळण करून स्वागत केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.