राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. नेताजींची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी केली जाते. नेताजींचा वारसा प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायक असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. साहस, बलिदान आणि राष्ट्रीय एकता या आदर्श गुणांसाठी नेताजी स्मरणात राहतील, असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात नमूद केलं आहे.
अदम्य साहस, दृढ संकल्प, निर्भय नेतृत्व तसंच अखंड राष्ट्रभक्ती यासाठी नेताजी नेहमीच स्मरणात राहतील, असं प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलं आहे. नेताजींच्या सन्मानार्थ देशभर सुरु करण्यात आलेल्या उपक्रमांचा उल्लेख त्यांनी केला.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं नाव नुसतं ऐकलं तरी देशबांधवांच्या हृदयात राष्ट्रभक्तीची भावना दाटून येते, असं सांगत केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनीही नेताजींना श्रद्धांजली वाहिली आहे. युवा वर्गानं नेताजींचा जीवनपट आणि पराक्रम जाणून घ्यावा आणि स्वतःची संकल्पशक्ती दृढ करण्यासाठी त्याचा वापर करावा, असं आवाहन शाह यांनी केलं आहे.