नेपाळमध्ये प्रमुख समाज माध्यम मंचांवर बंदी घातल्याच्या सरकारच्या निर्णया विरोधात तरुणांनी केलेल्या निदर्शनांना काल हिंसक वळण लागलं; यात 19 जणांचा मृत्यू झाला तर 300 हून अधिक जखमी झाले. त्यानंतर नेपाळ सरकारने काही समाज माध्यमांवर बंदी घालण्याचा आपला यापूर्वीचा निर्णय मागे घेतला आहे.
मंत्रिमंडळाच्या आपत्कालीन बैठकीनंतर नेपाळचे माहिती आणि प्रसारण मंत्री पृथ्वी सुब्बा गुरुंग यांनी घोषणा केल्यानुसार सरकारने समाज माध्यमांच्या साइट्सवर बंदी घालण्याचा आपला पूर्वीचा निर्णय मागे घेतला आहे.
प्रधानमंत्री केपी शर्मा ओली यांनी आंदोलना दरम्यान घडलेल्या घटनेची चौकशी करण्यासाठी एक चौकशी समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिलं आहे. मृतांच्या कुटुंबाला मदत दिली जाणार असून जखमींवर मोफत उपचार केले जाणार आहेत. नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला आहे.