नेपाळमधे समाज माध्यमांवरच्या बंदीविरोधात तरुणांच्या आंदोलनानं हिंसक वळण घेतलं असून तिथले प्रधानमंत्री के पी शर्मा ओली यांनी दिलेला राजीनामा आज राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी स्वीकारला. नवीन मंत्रिमंडळाची स्थापना होईपर्यंत त्यांना काळजीवाहू प्रधानमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळण्यास राष्ट्रपतींनी सांगितलं. तत्पूर्वी हजारो आंदोलकांनी ओली यांच्या कार्यालयात शिरून सरकारविरोधी घोषणाबाजी केली. बालाकोट इथल्या ओली यांच्या निवासस्थानाला आग लावली तसंच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर प्रधानमंत्री ओली यांनी राजीनामा दिला. त्याचप्रमाणे गृहमंत्री रमेश लेखक, आरोग्य मंत्री प्रदीप पौडेल, कृषी मंत्री रामनाथ अधिकारी, पाणीपुरवठा मंत्री प्रदीप यादव यांनीही राजीनामे दिले आहेत.
त्याआधी काल मोर्चावर केलेल्या गोळीबारात १९ जणांचा मृत्यू झाला होता, यामुळे आक्रमक झालेल्या आंदोलकानी अनेक मंत्र्यांच्या निवासस्थानावर दगडफेक करत जाळपोळ केली. दळणवळण मंत्री पृथ्वी सुब्बा गुरुंग यांच्या घराला आग लावण्यात आली. उपप्रधानमंत्री आणि अर्थमंत्री बिष्णू पौडेल यांच्या घरावरही आंदोलकांनी दगडफेक केली. माजी प्रधानमंत्री पुष्पकमल दहल प्रचंड आणि गृहमंत्री रमेश लेखक यांच्या घरांवरही दडगफेक झाली. माजी प्रधानमंत्री शेर बहादूर देऊबा यांच्या घरावरही आंदोलक चाल करून गेले होते, मात्र सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखलं. आंदोलकांनी काठमांडू इथल्या जिल्हा, विशेष आणि सर्वोच्च न्यायालयालाही आग लावली. त्याआधी त्यांनी न्यायालयातली कागदपत्रं नेल्याचं वृत्त आहे.
आज काठमांडू, पोखरा, इटहरी यासह अनेक शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र आंदोलकांनी संचारबंदी झुगारत नेपाळमधल्या अनेक शहरांमधे निदर्शनं आणि आंदोलनं केली. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत, मात्र अजूनही देशभरात तणावाचं वातावरण आहे.
नेपाळमधे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तिथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचं आणि नेपाळी प्रशासनानं दिलेल्या मार्गदर्शक सूचना पाळण्याचं आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं केलं आहे. नेपाळमधला तणाव शांत होईपर्यंत भारतीय नागरिकांनी तिथे प्रवास करण्याचं टाळावं असं आवाहन सरकारने केलं आहे. तसंच आवश्यकता असेल तर भारतीय दूतावासाच्या ९७७ ९८० ८६० २८८१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडिया आणि इंडिगो या विमान कंपन्यांनी दिल्ली ते काठमांडू दरम्यानची विमान उड्डाणं आज रद्द केली आहेत.