नेपाळमधे समाज माध्यमांवरच्या बंदीविरोधात तरुणांच्या आंदोलनावर गोळीबारानंतर आज काठमांडू, पोखरा, इटहरी यासह अनेक शहरात अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. काल मोर्चावर केलेल्या गोळीबारात १९ जणांचा मृत्यू झाला, तर ३४० पेक्षा जास्त जण जखमी झाले, याची जबाबदारी घेत नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक यांनी राजीनामा दिला. गोळीबाराच्या घटनेमुळे लेखक यांच्यावर चोहोबाजूंनी टीका झाली, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडूनही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. रमेश लेखक यांच्यासह आरोग्य मंत्री प्रदीप पौडेल, कृषी मंत्री रामनाथ अधिकारी, पाणीपुरवठा मंत्री प्रदीप यादव यांनीही राजीनामे दिले आहेत.
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात येईल, असं आश्वासन प्रधानमंत्री के पी शर्मा ओली यांनी दिलं आहे. मृतांच्या कुटुंबांना मदत तसंच जखमींवर मोफत उपचार केले जातील असं त्यांनी सांगितलं.
नेपाळमधे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तिथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचं आणि नेपाळच्या प्रशासनानं दिलेल्या मार्गदर्शक सूचना पाळण्याचं आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं केलं आहे. आंदोलनावर झालेल्या गोळीबारात तरुणांना जीव गमवावा लागणं दुःखद असून भारत सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहे, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे.
संयुक्त राष्ट्रांनीही नेपाळमधल्या घटनेबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. प्रशासनानं जनतेचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शांततापूर्ण आंदोलनाचा आदर करणं आवश्यक आहे, असं संयुक्त राष्ट्राचे प्रवक्ता स्टिफन दुजारिक म्हणाले. सरकारने आंदोलकांशी संवाद साधून शांततेच्या मार्गानं तोडगा काढावा असं आवाहन त्यांनी नेपाळला केलं.