उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावरचा विश्वासदर्शक ठराव आज विधानपरिषदेत आवाजी मतदानानं मंजूर झाला. यावर बोलू देण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली. सभापतींनी ती फेटाळून लावली. विरोधी पक्षांनी आपली मागणी लावून धरल्यानं सभागृहात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. त्यामुळे सभापतींनी कामकाज पंधरा मिनिटांसाठी तहकूब केलं.
विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्यावरील विश्वासदर्शक ठराव नियमबाह्य पद्धतीने आणल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केला. हा ठराव कोणत्या नियमानुसार मांडला याचा खुलासा करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. सभागृहाचं कामकाज एकांगी पद्धतीने सुरू असून सत्ताधारी पक्ष मुजोर झाल्याचा आरोप दानवे यांनी केला.
विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे याची माहिती विरोधी पक्षनेत्यांना नव्हती, पक्षांच्या गटनेत्यांच्या बैठकीत याची चर्चा का झाली नाही असा प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सदस्य अनिल परब यांनी विचारला. सभापतींनी यावर निर्णय द्यावा अशी मागणी विरोधी पक्षाने केली. ती तालिका सभापती चित्रा वाघ यांनी फेटाळल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. तसंच आजच्या दिवसभराच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. विरोधकांची ही भूमिका चुकीची असल्याची टीका मंत्री शंभूराज देसाई यांनी बातमीदारांशी बोलताना केली.