लोकसभा निवडणुकीत बनावट मतदान झाल्याचं सादरीकरण राहुल गांधी यांनी सखोल अभ्यास करून केलं आहे, मात्र निवडणूक आयोगानं गांधी यांना शपथपत्र सादर करायला सांगितलं हे योग्य नाही असं मत शरद पवार यांनी मांडलं. ते आज नागपूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपासंदर्भात निवडणूक आयोगाने सखोल चौकशी करायला हवी, असं पवार म्हणाले. यावर मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताने पवार म्हणाले की आक्षेप मुख्यमंत्र्यांवर नसून निवडणूक आयोगाबाबत आहे, त्यामुळे आयोगाकडून उत्तराची अपेक्षा आहे. याविषयी विरोधी पक्षाचे सर्व खासदार निवडणूक आयोग कार्यालयावर येत्या सोमवारी मोर्चा काढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत महाविकास आघाडीच्या घटक पक्षात अद्याप कोणतीही चर्चा झाली नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आजपासून राज्यभरात जनजागृती अभियान राबवलं जाणार आहे. राज्यात पन्नास टक्के लोकसंख्या तरुणांची आहे. त्यांच्यासमोर असंख्य प्रश्न असून त्याची सोडवणूक करण्याची गरज आहे, त्यादृष्टीने हे अभियान राबवलं जात असल्याचं पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं.