आज देशात नौदल दिवस साजरा होत आहे. समुद्री सीमा सुरक्षित ठेवण्यापासून ते समुद्रातल्या आव्हानात्मक परिस्थितीत जीवित बचाव मोहिमा राबवण्यापर्यंत, भारतीय नौदल आपल्या सामर्थ्याचं आणि राष्ट्रीय अभिमानाचं प्रतीक म्हणून खंबीरपणे उभं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात भारतीय नौदलाच्या कार्याची प्रशंसा केली. व्यापारमार्गांचे संरक्षण, अर्थव्यवस्थेची मजबुती आणि मानवतावादी मोहिमा अशा विविध क्षेत्रांत भारतीय नौदल आघाडीवर आहे. नौदलातील शिस्त, करुणा आणि जबाबदारी या गुणांचं राष्ट्रपतींनी कौतुक केलं. तसंच भारतीय नौदल राष्ट्राच्या सुरक्षेसह जागतिक पातळीवरही महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात नमूद केलं.
भारतीय नौदल देशाच्या सामुद्री शक्ती, सतर्कता आणि राष्ट्रीय हितांचं रक्षण करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे मूर्तिमंत प्रतिक आहे, अशा भावना उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केल्या.
आयएनएस विक्रांत या युद्ध नौकेवरील तैनात असलेले जवान आणि अधिकाऱ्यांसोबत साजरी केलेली दिवाळी अत्यंत संस्मरणीय होती, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. देशाच्या सागरी सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी नौदलाने दाखवलेलं शौर्य, समर्पण आणि कर्तव्यनिष्ठेचंही प्रधानमंत्र्यांनी कौतुक केलं.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही नौदल दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. हिंद महासागरातील सर्वात मोठी नौदल शक्ती म्हणून भारतीय नौदल शौर्य, सजगता आणि आत्मनिर्भरतेच्या भावनेने देशाच्या सागरी हितांचे संरक्षण करत असल्याचं सिंह यांनी समाज माध्यमावरील संदेशात नमूद केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही नौदल दिनानिमित्त जवानांना आणि अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय नौदल हे राष्ट्राच्या सागरी सीमांचे अभेद्य बुरूज असून अतुलनीय शौर्यानं देशाचं रक्षण करत असल्याचं शहा यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.
मुंबईत नेव्हल डॉकयार्ड इथं नौदल दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी नौदलाच्या पश्चिम विभागाच्या कार्मिक विभागाचे प्रमुख व्हाइस ॲडमिरल राहुल गोखले यांनी नेव्हल डॉकयार्ड इथल्या गौरव स्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून शहीदांना आदरांजली वाहिली.