देशात शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सर्व देशवासीयांना आरोग्य आणि सौभाग्यासाठी दुर्गामातेचे आशिर्वाद लाभो, अशी कामना त्यांनी केली. आजपासून जीएसटी बचत उत्सव सुरू होत असल्यामुळे यावर्षीचा नवरात्रोत्सव विशेष असल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे.
राज्यातल्या साडेतीन शक्तीपीठ ठिकाणीही घटस्थापना करण्यात आली. तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिर, कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर, नांदेड जिल्हातल्या माहुरचं रेणुका माता मंदिर तसंच वणीच्या सप्तशृंगी देवी मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे. नाशिकच्या श्री सप्तशृंगी देवी मंदिरात आज पहाटे विधिवत घटस्थापना करण्यात आली. देवस्थानाच्या अध्यक्षांच्या हस्ते दागिन्यांची पूजा करून मिरवणूक काढण्यात आली आणि महापूजा करून घटस्थापना करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या कर्णपुरा देवी यात्रेला आजपासून सुरुवात झाली. आज सकाळी देवीची महापुजा करण्यात आली.
यंदा दसरा अकराव्या दिवशी आला आहे, त्यामुळे आजपासून अकरा दिवस राज्यभरात आदिशक्तीची आराधना केली जाणार आहे.