भावी पिढ्या आरोग्यदायी असाव्यात यासाठी नैसर्गिक शेती करणं गरजेचं असल्याचं राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत राजभवनात मंत्रिमंडळ आणि विधानमंडळाच्या सदस्यांसाठी नैसर्गिक शेती या विषयावर आयोजित चर्चासत्राला मार्गदर्शन करताना बोलत होते. रासायनिक शेतीमुळे आरोग्यासह जमिनींचंही मोठं नुकसान होतं, तर नैसर्गिक शेतीमुळं उत्पादन वाढीसोबतच पर्यावरण रक्षण होतं, नैसर्गिक शेतीत समस्त प्राणिमात्रांचं कल्याण अंतर्भूत आहे, असं ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनीही या चर्चासत्रात मार्गदर्शन केलं. महाराष्ट्राला नैसर्गिक शेतीचं केंद्र बनवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. वातावरणातल्या तीव्र बदलांवर नैसर्गिक शेती हा शाश्वत उपाय आहे, असं ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नैसर्गिक शेती ही समाजाची आणि देशाची गरज असल्याचं मत व्यक्त केलं.
विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, विधान मंडळाचे सदस्य आणि अधिकारी या चर्चासत्राला उपस्थित होते.