अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांप्रमाणेच शिक्षण हे व्यक्तीचा स्वाभिमान आणि संरक्षणासाठी अत्यावश्यक असून संवेदनशील शिक्षक या भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवतात, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. शिक्षक दिनाच्या निमित्ताने, नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी देशात शिक्षक दिन साजरा केला जातो. या पुरस्कारविजेत्या शिक्षकांमध्ये महिलांची, तसंच ग्रामीण भागातल्या शिक्षकांची संख्या लक्षणीय आहे, याचा राष्ट्रपतींनी आवर्जून उल्लेख केला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातल्या तरतुदींचा उल्लेख करून मुलींच्या शिक्षणातली गुंतवणूक ही कुटुंब, समाज आणि देशाच्या उभारणीत अनन्यसाधारण भूमिका बजावते, असं प्रतिपादन त्यांनी केलं. आधुनिक भारताच्या उभारणीत सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करताना त्या म्हणाल्या.
गेल्या काही वर्षांत उच्च शिक्षण, तसंच स्टेम, अर्थात विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या क्षेत्रांमध्ये मुलींचा सहभाग वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी राष्ट्रपतींनी देशातल्या ६६ शिक्षकांना उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार प्रदान केले. त्यात राज्यातल्या ५ शिक्षकांचा समावेश आहे.
नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आणि विज्ञान विषयाचे शिक्षक डाॅ.शेख मोहम्मद वकीउद्दीन शेख हमीदउद्दीन यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून शाळेला शिक्षणासोबतच सामाजिक सुधारणांचं केंद्र बनवण्याचं काम केलं. त्यांनी मुलींसाठी तात्पुरत्या स्वरुपात शाळेची शाखा सुरु केली. ५ लाख सॅनीटरी नॅपकीन उपलब्ध करुन दिले तसंच सामाजिक सहकार्यानं निधी उभारून शिक्षणासाठीची डिजीटल सामग्री उपलब्ध करून दिली.
लातूरच्या दयानंद कला महाविद्यालयाचे संगीत विषयाचे प्राध्यापक डॉ. सांदिपान जगदाळे यांनी संगीत विषयाच्या अध्यापनाला शास्त्रीय ज्ञानासोबतच, नाविन्यपूर्ण प्रयोगांचीही जोड दिली. त्यांनी ब्रेल लिपीत संगीत अभ्यासक्रमाची पुस्तकं तयार केली तसंच QR कोडवर आधारित अभ्यास साहित्य विकसित करून शिक्षणाला अधिक सुलभ आणि परिणामकारक बनवलं. त्यांनी गोंड आदिवासी वस्त्यांमध्ये जाऊन शिक्षणाचा प्रसार केला, तसंच एचआयव्ही बाधित विद्यार्थ्यांचं शैक्षणिक पालकत्व घेतलं, यासोबतच ते दिव्यांग विद्यार्थ्यांनाही मदत करत आले आहेत.
बारामतीचे पुरुषोत्तम पवार मुंबईच्या डाॅ. नीलाक्षी सुभाष जैन आणि सोनिया विकास कपूर यांनाही राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार यंदा मिळाला आहे.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. पुरस्कार विजेत्या शिक्षकांशी नंतर राष्ट्रपतींनी अमृत उद्यानात संवाद साधला.