राष्ट्रीय पत्रकारिता दिन आज साजरा होत आहे. प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाची स्थापना या दिवशी १९६६मधे झाली होती. वर्तमानपत्रं आणि प्रसारमाध्यमांवर नैतिकदृष्ट्या देखरेख ठेवण्याचं काम ही संस्था करते. पत्रकारितेची स्वतंत्रता आणि जबाबदारी यांचं ते प्रतीक मानलं जातं. पत्रकारितेतल्या उत्कृष्ट कामगिरीसाठीचे राष्ट्रीय पुरस्कार या दिवशी प्रदान करण्यात येतात.
नवी दिल्ली इथं राष्ट्रीय पत्रकारिता दिनानिमित्त आयोजित समारंभाला माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आणि माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन, उपस्थित राहिले. पीसीआय च्या अध्यक्ष न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यावेळी उपस्थित होत्या. लोकशाहीमध्ये पत्रकारितेची भूमिका महत्त्वाची असल्याचं अश्विनी वैष्णव यावेळी म्हणाले.
आजच्याच दिवशी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियानं पत्रकारितेमध्ये जागल्याची भूमिका घेतली, आणि पत्रकारितेचं स्वातंत्र्य जपणं, आणि भारतीय पत्रकारितेचा दर्जा उंचावणं अशी दुहेरी जबाबदारी स्वीकारली, असं रंजना प्रकाश देसाई यांनी सांगितलं. पत्रकारितेमध्ये प्रामाणिकपणा, चिकाटी आणि अचूक माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याची वचनबद्धता हवी, तसंच सत्याचा शोध घेण्याचं धैर्य हवं असं त्या म्हणाल्या.