देशाचा विकास गावखेड्यांच्या विकासातून साकार होतो, या महात्मा गांधींच्या संकल्पनेवर पंचायती राज योजना राबवण्यात येत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. बिहारमध्ये मधुबनी इथे पंचायती राज दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
गेल्या दशकात पंचायतींना बळकट करण्यासाठी पावलं उचलण्यात आली आहेत. २ लाखांहून अधिक ग्रामपंचायती इंटरनेटने जोडल्या गेल्या त्यामुळे अनेक आवश्यक कागदपत्रं मिळणं सुलभ झालं. स्वातंत्र्यानंतर अनेक दशकांनंतर ३० हजार नवीन पंचायत भवन इमारती बनवल्या गेल्या. तसंच दहा वर्षांत २ लाख कोटींहून अधिक निधी पंचायतींना मिळाला आहे असंही मोदी यावेळी म्हणाले.
यावेळी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १३ हजार ५०० कोटी रुपये खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचं पायाभरणी, उद्धाटन आणि लोकार्पण करण्यात आलं. यात जयनगर ते पाटणा दरम्यान धावणाऱ्या नमो भारत रॅपिड रेल्वे आणि सहरसा ते मुंबईत लोकमान्य टिळक टर्मिनस पर्यंत धावणाऱ्या अमृत भारत एक्सप्रेसचा समावेश आहे. तसंच, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या १५ लाख नव्या लाभार्थ्यांना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते स्वीकृती पत्र प्रदान करण्यात आली. या योजनेच्या १० लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ताही त्यांच्या हस्ते जारी करण्यात आला आणि १ लाख लाभार्थ्यांचा गृहप्रवेशही करण्यात आला. ५ हजार ३० कोटी रुपये खर्चाच्या विद्युत प्रकल्पांचं लोकार्पण करण्यात आलं. पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्यांना प्रधानमंत्र्यांनी काही क्षण मौन पाळून आदरांजली वाहिली.