प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आर्थिक विकासासाठी पायाभूत सुविधा मजबूत करत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. आंध्र प्रदेशात मंगलागिरी इथं ५ हजार २३३ कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीच्या २७२ किमी लांबीच्या २९ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केल्यानंतर गडकरी काल बोलत होते.
गेल्या अकरा वर्षात राष्ट्रीय महामार्गांची लांबी १२० टक्क्यांनी वाढली आणि २०१४ मध्ये असलेले ४ हजार किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग लांबी आता ८ हजार ७०० किलोमीटर झाल्याची माहिती गडकरी यांनी दिली. सुधारित रस्ते, पायाभूत सुविधांमुळे, दळणवळणाचा खर्च १६ टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत कमी झाला असून डिसेंबर २०२५ पर्यंत या खर्चात आणखी नऊ टक्क्यांपर्यंत घट होण्याचा अंदाज आहे असं त्यांनी सांगितलं.