देश आज अकरावा राष्ट्रीय हातमाग दिन साजरा करत आहे. ब्रिटीशांच्या राजवटीचा विरोध करताना हातमागासह अन्य स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन म्हणून ७ ऑगस्ट १९०५ रोजी सुरू झालेल्या स्वदेशी चळवळीच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. या निमित्ताने केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी आज नवी दिल्लीत संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार प्रदान केले.
सोलापूरच्या राजेंद्र सुदर्शन अंकम यांना संत कबीर हातमाग पुरस्कार मिळाला आहे. साडेतीन लाख रुपये रोख, सुवर्णमुद्रा, ताम्रपट, शाल आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. सुती वॉल हँगिंग, गालिचे यांच्यावर चित्र विणण्याच्या एकमेवाद्वितीय कौशल्यासाठी अंकम यांना हा पुरस्कार मिळाला आहे. निसर्गचित्र आणि व्यक्तिचित्र अशा दोन प्रकारांमध्ये अंकम विणकाम करतात.
हातमाग क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे देशभरातले उत्कृष्ट विणकर, विक्रेते, संकल्पनाकार तसंच स्टार्टअप्स आणि उत्पादकांच्या कामाची दखल घेणं हा या पुरस्काराचा उद्देश आहे.