देशभरात आज संविधान दिवस साजरा केला जात आहे. “हमारा संविधान – हमारा स्वाभिमान” ही यंदाची संकल्पना आहे. नवी दिल्लीत संविधान सदनाच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या मुख्य सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, लोकसभेचे सभापती ओम बिरला, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यसभेतले सभागृह नेते जेपी नड्डा, तसंच दोन्ही सभागृहातले विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी आणि संसद सदस्य सहभागी झाले होते. राष्ट्रपतींच्या नेतृत्वाखाली सर्वांनी संविधानाच्या प्रस्तावनेचं वाचन केलं. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचे प्रतिनिधित्व करणारी भारतीय संसद, आपल्या संविधानकर्त्यांनी मांडलेल्या स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुत्वाच्या आदर्शांवर पुढे जात आहे, असं राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या. गेल्या दशकात, भारताने जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने सातत्याने प्रगती केली आहे, संविधानकारांच्या दूरदृष्टीचं आणि त्यांनी व्यक्त केलेल्या आकांक्षांचं हे फलित असल्याचं त्यांनी सांगितलं.
या कार्यक्रमात संविधानाच्या मराठीसह 9 भाषांतल्या अनुवादाचं प्रकाशन राष्ट्रपतींच्या हस्ते झालं.
संविधान दिवसानिमित्त आज देशाच्या कानाकोपऱ्यात सर्वत्र सरकारी आणि निमसरकारी कार्यालयं, आस्थापना तसंच विविध संस्था संघटनांमधे संविधानाच्या प्रस्तावनेचं वाचन करण्यात येत असून संविधानकर्त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. आकाशवाणीच्या देशभरातल्या केंद्रांप्रमाणेच मुंबईतल्या प्रसारण भवन कार्यालयातही संविधानदिनानिमित्त प्रास्ताविका वाचन करण्यात आलं.