नाशिकच्या तोफखाना केंद्र आणि आर्मी एव्हिएशन सेंटरमधील १५ अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग- सीबीआयनं त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत कारवाई केल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक इथल्या तोफखाना केंद्र आणि आर्मी एव्हिएशन सेंटरमध्ये काम करणारे लेखापरीक्षक, सहाय्यक लेखाधिकारी आणि लिपिकांनी वेतन आणि भत्ते वेळेवर देण्यासाठी लष्करी कर्मचाऱ्यांकडून पैसे उकळले. सीबीआय आणि पुण्याच्या संरक्षण लेखा नियंत्रकांनी संयुक्तपणं टाकलेल्या छाप्यात व्हॉट्सॲप चॅट्स, लाच मागणीचे संदेश आणि बँक व्यवहारांचे पुरावे हाती लागले. याशिवाय, लाच घेण्यासाठी वापरलेली बँक खाती आणि त्यातील व्यवहारांची माहितीही सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी तपासली. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली दोषींवर गुन्हे दाखल झाले आहेत.
दरम्यान, सीबीआयनं मुंबई, नाशिक, लखनऊ, अहमदाबाद आणि नागपूर इथंही काही लष्करी अधिकाऱ्यांच्या घरी छापे टाकले आहेत. सीबीआयचा तपास सुरू असून, याप्रकरणी आणखी खुलासे होण्याची शक्यता ही वृत्तसंस्थेच्या बातमीत वर्तवली आहे.