विकसित भारताच्या तंंत्रज्ञानातल्या भविष्याशी संबधित सर्व भागीदार युग्म या परिषदेत एकत्र आले आहेत. असं सांगत प्रधानमंत्र्यांनी भारताने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात केलेली प्रगती नमूद केली. युग्म या धोरणात्मक परिषदेला आज दिल्लीत भारत मंडपम इथं सुरुवात झाली. त्या परिषदेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी संबोधित केलं. भारताची संशोधन क्षमता आणि डीप टेकमध्ये भारताची क्षमता वाढवण्यासाठी जे प्रयत्न होत आहेत त्याला या परिषदेच्या आयोजनातून बळ मिळेल असं ते म्हणाले. परिषदेच्या माध्यमातून आयआयटी कानपूर आणि आयआयटी मुंबई इथे कृत्रिम बुद्धिमत्ता, गुप्तवार्ता, जैवतंत्रज्ञान आणि वैद्यकशास्त्र यासाठीच्या भव्य केंद्राची सुरुवात होत आहे, असं त्यांनी सांगितलं.
संशोधन स्तरावर भारताच्या प्रगतीचा आढावा घेताना त्यांनी, भारतीय उच्च शिक्षण संस्थातून २०१४ या वर्षात सादर झालेल्या पेटंटची संख्या ४० हजार होती ती आता ८० हजाराहून जास्त झाल्याचं सांगितलं. नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारताच्या शिक्षण पद्धतीत लक्षणीय बदल होत आहेत. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थी घडवण्याच्या दृष्टीनं नवीन शैक्षणीक धोरण राबवलं जात आहे असं सांगत त्यांनी या धोरणाची वैशिष्ट्ये आणि त्यातून शिक्षणक्षेत्रात होत असलेले बदल नमूद केले.
देशातल्या शिक्षणपद्धतीचा एकविसाव्या शतकाच्या गरजांशी मेळ घालण्यासाठी सरकार जोमाने प्रयत्न करत आहे. प्रतिभा, वृत्ती आणि तंत्रज्ञान ही भारताच्या यशाची त्रिसूत्री असल्याचं सांगून त्यांनी जगातल्या सर्वोच्च दर्जाच्या शिक्षणसंस्था देशात आल्या आहेत एवढंच नव्हे तर भारतातल्या संस्थांसुद्धा परदेशात शाखा उघडत आहेत असं नमूद केलं. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला जागतिक संशोधन प्रकाशनांपर्यंत पोहचता यावं यासाठी प्रधानमंत्री रिसर्च फाउंडेशन कार्यरत आहे असंही त्यांनी सांगितलं.
युग्म या परिषदेला सरकार, शैक्षणिक संस्था, उद्योग आणि नवोन्मेष परिसंस्थेतील अग्रणी उपस्थित आहेत. भारताच्या नवोन्मेष परिसंस्थेत खाजगी गुंतवणूकीला प्रोत्साहन देणे, प्रमुख तंत्रज्ञानात संशोधन ते व्यावसायीकरण प्रक्रियेला गती देत शिक्षण उद्योग आणि सरकार ही भागीदारी मजबूत करणे आणि त्यायोगे विकसित भारत @2047 साठी राष्ट्रीय नवोन्मेषाच्या आराखड्याला चालना देणे हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे.