नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ

हवामान अनुकूल शेती विकासासाठी राबवल्या जाणाऱ्या नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबईत झाला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार तसंच कृषीमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते. प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील प्रकल्प गावामध्ये शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.  यामध्ये पाण्याच्या व्यवस्थेसाठी नवीन शेततळे, अस्तरीकरण, तुषार आणि ठिबक सिंचन, विहिरींचं पुनर्भरण, सेंद्रिय खत निर्मिती, फळबाग लागवड, बांबू आणि वृक्ष लागवड, रेशीम उद्योग, संरक्षित शेती, संवर्धित शेती, बिजोत्पादन यांचा समावेश आहे. हा प्रकल्प ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मजबूत करण्यासाठीचं एक ठोस पाऊल आहे, असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले.