गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुका आणि छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागातल्या जंगलात आज नक्षलवादी आणि पोलिसांत चकमक झाली. या चकमकीत चार जहाल नक्षलवादी ठार झाले.
दोन महिन्यापूर्वीच भामरागड तालुका आणि छत्तीसगड सीमेवर कवंडे गावात नक्षलवादी लपून असल्याची माहिती मिळाल्यावरुन संयुक्त शोध मोहिम सुरू होती. त्या दरम्यान आज सकाळी नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात चार नक्षलवादी मारले गेले. चकमक सुमारे दोन तास सुरू होती. चकमक थांबल्यानंतर घटनास्थळाची पाहणी केली असता मोठा शस्त्रसाठा हाती लागला.
दरम्यान, मारले गेलेले नक्षलवादी हे उपकमांडर दर्जाचे असून अद्याप त्यांची ओळख पटली नसल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात किस्ताराम इथं नक्षलवादी आणि सुरक्षा दलात काल संध्याकाळी झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी मारला गेला.