जनसेवेच्या कार्यात युवकांनी मोठ्या उत्साहानं सहभागी व्हायला हवं. नैतिक मूल्यांवर आधारित राजकारणात सहभाग घेणं हे जनसेवेचं प्रभावी माध्यम असल्याचं प्रतिपादन माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्त नागपूरात आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. २०४७ पर्यंतच्या विकसित भारतात संघांचं महत्त्वपूर्ण योगदान असेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी त्यांनी देश तसंच संघाच्या कार्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या व्यक्तींचं स्मरण केलं. सरसंघचालक मोहन भागवत यांनी यावेळी संघाच्या १०० वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला. सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, शिस्त आणि संविधानाच पालन या पंचसूत्रीचा अधिकाधिक अवलंब करण्याचं आवाहन त्यांनी केलं. आत्मनिर्भर भारत निर्माण करताना देशाच्या गरजेनुसारच इतर राष्ट्रांवर अवलंबून रहावं, असंही ते यावेळी म्हणाले.
पहलगाम हल्ल्याला भारतानं दिलेल्या प्रत्युत्तराचं त्यांनी स्वागत केलं. भाषा, प्रांत आणि जात या मुद्द्यावरुन भेदभाव निर्माण करणाऱ्यांपासून सावध राहण्याचं आवाहन त्यांनी केलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह विविध मान्यवर, स्वयंसेवक या कार्यक्रमाला उपस्थित होते. संघाच्या शतकपूर्तीनिमित्त देशभरात विविध ठिकाणी संचलन आणि इतर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.