महाराष्ट्रातल्या सर्व २४३ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी येत्या २१ डिसेंबरला करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिले आहेत. सुरवातीच्या कार्यक्रमानुसार या सर्व जागांसाठी आज मतदान होणार होतं, मात्र न्यायालयीन अपील झालेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये २० डिसेंबरला मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला. यामध्ये २४ नगराध्यक्ष आणि २०४ सदस्यांच्या जागांचा समावेश आहे.
\
सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत, अन्यथा २० डिसेंबरला निवडणूक होणाऱ्या जागांच्या निकालावर प्रभाव पडू शकतो, अशी याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर पीठासमोर आली होती. त्यावर आज झालेल्या सुनावणीत न्यायालयानं सर्व ठिकाणचे निकाल २१ डिसेंबरला जाहीर करण्याचे आदेश दिले. या निवडणुकीचे एक्झिट पोलही २० डिसेंबरचं मतदान संपल्यानंतर अर्धा तासानं जाहीर करता येतील, आणि निवडणूक आचारसंहिताही २० डिसेंबरपर्यंत लागू राहील, असं न्यायालयानं स्पष्ट केलं.