नगरपालिका नगराध्यक्षपदांच्या निवडणूक निकालात भाजपाला सर्वाधिक जागा

राज्यातल्या २८८ नगरपालिका, आणि २८५ नगराध्यक्षपदांच्या निवडणुकांच्या निकालात महायुतीतल्या घटक पक्षांनी सरशी साधली असून, भाजपानं सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंही चांगलं यश मिळवलं, मात्र महाविकास आघाडीतल घटक पक्षांना अपेक्षित यश मिळालं नाही. 

तीन नगराध्यपदांसाठीच्या निवडणूका याआधीच बिनविरोध झाल्या होत्या. मतमोजणीची अधिकृत आकडेवारी अद्याप आयोगाकडून मिळाली नाही. मात्र आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी स्थानिक निवडणूक निकालांच्या बातम्या दिल्या आहेत. त्यानुसार

पुणे जिल्ह्यातल्या १४ नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायतींच्या निवडणुकांमधे १० ठिकाणी नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडं गेलं आहे. लोणावळा, दौंड, इंदापूर, जेजुरी, बारामती आणि फुरसुंगी या नगरपरिषदांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्ता मिळवली आहे. तळेगाव आणि शिरूर इथं बहुमत भाजपाला असलं तरी नगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलं आहे. चाकण, जुन्नर आणि राजगुरुनगर इथं शिवसेना, तर सासवड आणि आळंदी इथं भाजपानं सत्ता मिळवली आहे. भोर नगरपरिषदेत बहुमत भाजपाचं असलं तरी नगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडं गेलं आहे. 

कोल्हापूरात मतदारांनी स्थानिक आघाड्यांना पसंती दिल्याचं चित्र आहे. जिल्ह्यात नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने २, शिवसेनेने २, जनसुराज्य पक्षाने २ तर राष्ट्रवादी काँग्रेसने २ ठिकाणी विजय मिळवला. उर्वरीत पाच ठिकाणी स्थानिक आघाडीचे उमेदवार विजयी झाले.

साताऱ्यात १० पैकी सात पालिकांत भाजपचे नगराध्‍यक्ष झाले, तर दोन ठिकाणी राष्‍ट्रवादी काँग्रेस आणि कराड इथं शिवसेनेच्या उमेदवारांनी नगराध्‍यक्षपदाची निवडणूक जिंकली.

सांगलीत आटपाडी आणि जत मध्ये भाजपाचे, शिराळा आणि विटा इथं शिवसेनेचे उमेदवार नगराध्यक्षपदी निवडून आले. तर इश्वरपूर इथं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, आष्ट्यात स्थानिक आघाडी, पलूसमध्ये काँग्रेस आणि तासगाव इथं स्वाभिमानी आघाडीचे उमेदवार निवडून आले.

अहिल्यानगरमध्ये राहाता, देवळाली प्रवरा, पाथर्डी, शिर्डी, श्रीगोंदा, जामखेड, कोपरगावमध्ये भाजपानं नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. संगमनेरच्या नगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीच्या डॉ. मैथिली तांबे विजयी झाल्या. श्रीरामपूरमध्ये काँग्रेस, तर शेवगाव आणि नेवासा इथं शिवसेनेच्या उमेदवारांनी बाजी मारली.

नागपूर मध्ये बेसा पिपळा, भिवापूर, बहादूरा या तीन ठिकाणी भाजपाचे उमेदावर नगराध्यक्ष म्हणून निवडून आले, तर मोहपा इथं काँग्रेसच्या उमेदवारानं बाजी मारली.

अमरावतीत १२ पैकी सहा ठिकाणी भाजपाचे उमेदवार नगराध्यक्ष म्हणून निवडून आले, तर दोन ठिकाणी काँग्रेसचे उमेवार जिंकले. याशिवाय प्रहार, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून आला.

 अकोल्यात बार्शीटाकळीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या अफसर खातून अलीमुद्दीन यांनी भाजपाच्या कोकिळा येळवणकर यांचा पराभव केला. अकोट, हिवरखेड, तेल्हारा, आणि मुर्तीजापुरमध्ये भाजपाचे उमेदवार निवडून आले. तर बाळापुर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या आफरीन परवीन मोहम्मद जमीर विजयी झाल्या आहेत.

गडचिरोलीत, गडचिरोली, आरमोरी आणि देसाईगंजच्या नगराध्यक्षपदी भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. 

छत्रपती संभाजीनगरमध्ये सिल्लोड आणि पैठण इथं शिवसेनेच्या उमेदवारांनी विजय मिळवला, तर कन्नड आण खुलताबादमध्ये काँग्रेसचे नगराध्यक्ष झाले. राष्ट्रवादी काँग्रेसनं गंगापूर, भाजपानं वैजापूर तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं फुलंब्रीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकली.

लातूर जिल्ह्यात अहमदपूर नगरपरिषदेत नराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे स्वप्निल व्हत्ते विजयी झाले. नगरसेवकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं १६ जागांवर विजय मिळवला. भाजप आणि काँग्रेसनं प्रत्येकी ३, शिवसेना उद्धव ठाकरे तसंच शिवसेनेनं प्रत्येकी एका जागेवर विजयी मिळवला.

उदगीर आणि निलंग्यात भाजपानं, तर औसा इथं राष्ट्रवादीच्या उमेदवारानं नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. 

नांदेडमध्ये भोकर, मुदखेड, कोटलवार इथं भाजपाने, लोह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने, उमरी आणि देगलूर इथंज राष्ट्रवादी काँग्रेसने, मुखेड आणि हदगाव मध्ये शिवसेनेने, किनवट इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने,  कंधारमध्ये आणि हिमायतनगरमध्ये काँग्रेसने तर बिलोली धर्माबाद मध्ये मराठवाडा जनहित पार्टीच्या उमेदवारांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकली.

बीड जिल्ह्यातल्या सहा नगराध्यक्षांपैकी बीड, माजलगाव, किल्ले धारूर या तीन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नगराध्यक्ष म्हणून विजयी झाले. अंबाजोगाई, गेवराई या दोन ठिकाणी भाजपाचे उमेदवार जिंकले. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला केवळ माजलगावच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकता आली. 

जालन्यात परतूर, आणि अंबडमध्ये भाजपाचे उमेदवार जिंकले तर भोकरदनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या समरीन मिर्झा नगराध्यक्षपदी निवडून आल्या. 

धाराशिव जिल्ह्यात चार ठिकाणी भाजपाचे आणि चार ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार नगराध्यक्ष म्हणून निवडून आले.

नाशिक मध्ये ११ पैकी ५ ठिकाणी नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या उमेदवारांनी बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाचे प्रत्येकी तीन उमेदवार नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. भगूर नगरपालिकेत २७ वर्षांनी सत्तांतर झालं. तिथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रेरणा बलकवडे निवडून आल्या.

धुळ्यात शिंदखेड्याचं नगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसनं जिंकलं. पिंपळनेरमध्ये भाजपाच्या उमेदवार विजयी झाल्या.

 

रायगड जिल्ह्यातल्या दहा नगरपालिकांपैकी महाड, श्रीवर्धन, माथेरान आणि खोपोली नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या उमेदावारांनी बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेसनही रोहा आणि मुरूड नगरपालिकेत विजय मिळवला. शेकापनं अलिबागच्या नगराध्यपदाची निवडणूक जिंकून आपलं वर्चस्व कायम राखलं, तर कर्जत आणि उरणमध्ये स्थानिक आघाड्यांचे उमेदवार विजयी झाले.

रत्नागिरी जिल्ह्यातल्या रत्नागिरी, चिपळूण, खेड, राजापूर या चार नगर परिषदांमध्ये चार ठिकाणी शिवसेना, दोन ठिकाणी भाजप, तर एका ठिकाणी काँग्रेसला नगराध्यक्षपद मिळालं. खेड नगर परिषदेत नगराध्यक्षपदासह सर्वच्या सर्व २१ जागांवर महायुतीचा विजय झाला.

सिंधुदुर्गात सावंतवाडी आणि वेंगुर्ल्यामध्ये भाजपच्या उमेदवारांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. मालवणमध्ये शिवसेना तर कणकवलीत शहर विकास आघाडीचा नगराध्यक्ष झाला आहे. 

पालघर जिल्ह्यात शिवसेनेचे २ तर, भाजपाचे २ उमेदार नगराध्यक्षपदी निवडून आले.