गेल्या काही दिवसांपासून नागालँडमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत भूस्खलन आणि दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. कोहीमाम इथं काल फेसेमा ते किसामा -कीगवेमा या मार्गावर भूस्खलन झालं. यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला असून याठिकाणच्या पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान झालं आहे. या मार्गाच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलं आहे. दरम्यान, कोहिमा ते मणिपूरला जोडणारा मार्गावरून मर्यादित प्रमाणात वाहतूक सुरू केली आहे.
नागालँडमध्ये जूनपासून सातत्यानं पाऊस पडत असल्यानं किसामाजवळचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २ चं मोठं नुकसान झालं. हा मार्ग हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला केला जात आहे. मुख्यमंत्री नेफ्यू रिओ आणि उपमुख्यमंत्री टी.आर. झेलियांग यांनी दरड कोसळलेल्या ठिकाणांची तसंच नुकसान झालेल्या महामार्गांची पाहणी केली. इथली परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी राज्य सरकार युद्ध पातळीवर उपाययोजना करत असल्याचं मुख्यमंत्री रिओ यांनी सांगितलं.