कृषी उत्पादनाच्या प्रक्रियेतले मध्यस्थ दूर करून, नाफेड लवकरच शेतकऱ्यांकडून खरेदी करायला सुरुवात करणार असल्याची घोषणा केंद्रीय गृह आणि सहकारिता मंत्री अमित शहा यांनी केली आहे. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त आयोजित राष्ट्रीय परिसंवादात ते काल मुंबईत बोलत होते. यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनाची योग्य किंमत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सरकार लवकरच सहकार सूत्रावर आधारित विमा कंपनीही सुरू करणार असल्याचं ते म्हणाले.
देशभरात दोन लाख नव्या प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था स्थापन करणार असल्याची माहिती शहा यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना महाराष्ट्राला लाभलेला 120 वर्षांचा सहकार चळवळीचा इतिहास अधोरेखित केला. देशाची अन्नसुरक्षा अबाधित राखणं, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं, देशवासीयांना पोषणयुक्त आहार देणं आणि पृथ्वीचं हित जपणं ही सरकारसमोरची प्रमुख उद्दिष्टं असल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या परिषदेत केलं.