अर्ज भरण्याची मुदत संपली, पक्षांतर करुन उमेदवारी पदरात

आज अखेरच्या दिवसापर्यंत अनेक ठिकाणी युती, आघाडी, उमेदवारी यादी यांचं चित्र स्पष्ट झालं नव्हतं. त्यामुळं राजकीय पक्ष आणि उमेदवारांसह मतदारांमध्ये संभ्रम होता. त्यामुळे अनेकांनी अखेरच्या दिवशी पक्षांतर करुन उमेदवारी पदरात पाडून घेतली.

 

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटपाचं सूत्र निश्चित होऊन १३७ जागी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तर ९० जागी शिवसेनेचे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. रिपब्लिकन पक्षाला जागावाटपातून वगळल्याबद्दल पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांनी विश्वासघात झाल्याची भावना व्यक्त करत ३९ जागांवर ‘मैत्रीपूर्ण लढती’साठी उमेदवार जाहीर केले. आठवले यांचे काही गैरसमज झाले असतील तर ते दूर करू असंही भाजपा नेते आशीष शेलार म्हणाले. दुसरीकडे काँग्रेससोबत आघाडीमधे लढणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला वीस जागांसाठी उमेदवार कमी पडले आहेत. आघाडीमधे त्यांच्या वाट्याला ६२ जागा आल्या होत्या. उमेदवार न मिळाल्यामुळे वीस फॉर्म त्यांनी परत पाठवल्याचं काँग्रेसने नेत्यांनी सांगितलं. तर राष्ट्रवादी काँग्रेसने ३० उमेदवारांची तिसरी यादी आज जाहीर केली. 

 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुंबईसाठी उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप सुरु केलं असून अद्याप अंतिम उमेदवार यादी जाहीर केलेली नाही. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं मुंबईतलं माजी नगरसेवक दांपत्य स्नेहल जाधव आणि सुधीर जाधव यांनी काल एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. 

 

दरम्यान, ज्या प्रभागात समाजवादी पार्टी निवडणूक लढत नाही अशा प्रभागात भाजपाने उमेदवारी नाकारलेल्या उत्तर भारतीय उमेदवाराला आपला पक्ष समर्थन देईल, असं आमदार अबु आझमी यांनी म्हटलं आहे. 

 

ठाण्यात शिवसेना ८७ आणि भाजपा ४० जागांवर निवडणूक लढवत असल्याचं शिवसेना खासदार नरेश म्हस्के म्हणाले. नवी मुंबईत शिवसेना १११ जागा आणि वसई विरारमध्ये २७ जागा शिवसेना लढवत असल्याची माहिती त्यांनी दिली. भिवंडी, मीरा-भाईंदरमध्ये भाजपा आणि शिवसेना युती झालेली नाही. 

 

पनवेल महानगरपालिकेसाठी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्ष यांची युती जाहीर करण्यात आली आहे. यानुसार भाजपा ७१, शिवसेना ४, राष्ट्रवादी काँग्रेस २, आणि आरपीआय एका जागेवर लढणार आहे.

 

राज्यातल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. उद्या या अर्जांची छाननी होणार असून २ जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील. ३ जानेवारीला निवडणूक चिन्हाचं वाटप होईल आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होईल. येत्या १५ जानेवारीला मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी होईल.