महापालिका निवडणूक वंचित बहुजन आघाडीसोबत लढवण्याचे काँग्रेसचे प्रयत्न

महानगरपालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीबरोबर आघाडी व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं. काँग्रेस पक्षाच्या राज्य निवडमंडळाची बैठक आज मुंबईत टिळक भवन इथं झाली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी चर्चा सुरू आहे, याशिवाय कुठल्याही पक्षाचा आघाडीसाठी प्रस्ताव आलेला नाही, तसा प्रस्ताव आला तर विचार करू असं सपकाळ म्हणाले. 

 

मुंबईत काँग्रेस स्वतंत्र लढेल, इतर कुणाशी युती करायची ते चर्चेतून ठरवलं जाईल, असं विजय वडेट्टीवार यांनी वार्ताहरांना सांगितलं. निवडणुकीत उमेदवार देण्याचे निकष कोणते असावेत, कुणासोबत आघाडी करावी वगैरे विषयांवर आज निवडमंडळाच्या सदस्यांनी चर्चा केली असं ते म्हणाले. शनिवारपासून उमेदवारी अर्जांचं वाटप केलं जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.