महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागं घेण्याची मुदत आज संपली. आता ठिकठिकाणच्या लढतींचं चित्र स्पष्ट होईल. अनेक ठिकाणी उमेदवारांना प्रतिस्पर्धी न उरल्यानं त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. अनेक ठिकाणी मुळातच एकमेव अर्ज आले होते, तर काही ठिकाणी छाननीत इतर अर्ज बाद झाल्यानं उमेदवार बिनविरोध आहेत. उद्या निवडणूक चिन्हाचं वाटप झाल्यानंतर अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल.
उमेदवारी मागे घेण्याच्या घडामोडींमुळे ठाणे शहरात शिवसेनेच्या पाच उमेदवारांना प्रतिस्पर्धी उरलेले नाहीत. ठाण्यात शिवसेनेने उमेदवारी नाकारलेल्या विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने पुरस्कृत केले असून त्या पक्षाच्या उमेदवार दिपा गावंड यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे.
बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या गोवंडी विभागात समाजवादी पार्टीचे उमेदवार इरफान खान यांनी आपलं अर्ज मागे घेऊन काँग्रेसच्या उमेदवाराला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत भाजपाचे १५ उमेदवार तर शिवसेनेचे पाच उमेदवार बिनविरोध ठरले आहेत.
भिवंडी – निजामपूर मतदारक्षेत्रात भाजपाचे सहा उमेदवार बिनविरोध ठरले आहेत.
जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता भारतीय जनता पक्षाच्या ६ तर शिवसेनेच्या ६ जागा बिनविरोध झाल्या आहेत . त्यामुळे आता ६३ जागांसाठी निवडणूक होईल.
धुळे महापालिका निवडणुकीत आज अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी भाजपाचे चार नगरसेवक बिनविरोध ठरले आहेत. उमेदवारी मागे घेण्यावरून धुळ्यात मोठा वाद झाल्याचं दिसून आलं. देवपूर परिसरात दोन गटांमध्ये हाणामारीचा प्रकारही घडला.
नाशिक महानगरपालिकेत बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले जावेत, यासाठी नेत्यांनी मोठे प्रयत्न केले.
सिडको विभागात हर्षा बडगुजर यांनी आपली उमेदवारी मागे घेतली.
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 682 अर्ज पडताळणीअंती वैध ठरले होते. शेवटच्या दिवशी 301 उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता 78 जागांसाठी 381 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.