Municipal Election : महानगरपालिका निवडणुकीसाठी अंतिम यादी जाहीर

राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकीसाठी १५ हजार ९३१ उमेदवार रिंगणात आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगानं आज दिली. २९ महापालिकांमधल्या २ हजार ८६९ प्रभागांमधून हे उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी एकंदर ३३ हजार ४२७ अर्ज आले होते. त्यातले २४ हजार ७७१ अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी ८ हजार ८४० उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. आज सकाळी चिन्ह वाटप करुन अंतिम उमेदवार यादी आज प्रसिद्ध झाली आहे. 

 

राज्यात सर्वाधिक १ हजार ७०० उमेदवार मुंबई महापालिकेच्या रिंगणात आहे. त्यानंतर १ हजार १६६ उमेदवार पुणे महापालिका निवडणुकीत नशीब आजमावत आहेत. नागपूरमध्ये ९९३ उमेदवार नगरसेवकपदासाठी इच्छुक आहेत. सर्वात कमी २३० उमेदवार इचलकरंजी महापालिकेच्या १६ प्रभागांसाठी निवडणुक रिंगणात आहेत.