मराठवाड्यात लातूर, परभणी महापालिका वगळता उर्वरित सात महापालिकांमध्ये भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत २९ प्रभागांमधल्या ११५ जागांपैकी ५२ जागांवर भाजप विजयी झाला आहे. शिवसेनेला १४ जागांवर विजय मिळाला. तर एमआयएम २४ जागांवर विजयी ठरला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ६ जागांवर विजयी झाला असून वंचित बहुजन आघाडी ४ तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला अवघ्या एका जागेवर विजय मिळाला.
जालना महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाने १६ प्रभागांमधल्या ६५ पैकी ४१ जागांवर विजय मिळवून स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. शिवसेनेला १२ जागांवर, काँग्रेसला ९ जागांवर विजय मिळाला आहे. एक अपक्ष उमेदवारही निवडून आला आहे. काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा भाजपामध्ये प्रवेश हा या निवडणुकीत निर्णायक ठरला. तर दुसरीकडे २ जागांवर विजय मिळवून एमआयएमने आपलं खातं उघडलं आहे.
नांदेड वाघाळा महापालिकेत २० प्रभागांमधल्या ८१ जागांपैकी ४५ जागांवर भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलं. महापालिकेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच भाजप सत्तेत आला आहे. काँग्रेसला १० तर एमआयएमला १५ जागा मिळाल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीने ५ जागांवर विजय मिळवला असून शिवसेनेला चार जागा तर राष्ट्रवादी काँग्रेसला एका जागेवर विजय मिळाला आहे.
परभणी महापालिकेत १६ प्रभागांमधल्या ६५ जागांपैकी शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाने २५ जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेस १३ जागांवर विजयी झाला आहे. भाजपला १२ जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेसला १० जागांवर विजय मिळाला आहे. तसंच ५ अपक्ष उमेदवारही निवडून आले आहेत.
लातूर महापालिकेत १८ प्रभागांमधल्या ७० जागांपैकी ४३ जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपाला २२ जागांवर तर अपक्षांना ४ जागांवर विजय मिळाला आहे.
धुळे महापालिकेत १९ प्रभागांमधल्या ७४ जागांपैकी भाजपने ५० जागांवर विजय मिळवला असून शिवसेनेला अवघ्या ५ जागांवर विजय मिळाला आहे. एमआयएम १० जागांवर, राष्ट्रवादी काँग्रेस ८ तर एका जागेवर अपक्ष निवडून आला असून महाविकास आघाडीला या महापालिकेत एकाही जागेवर विजय मिळालेला नाही.
जळगाव महापालिकेत १९ प्रभागांमधल्या ७५ जागांपैकी ४० जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. शिवसेनेला १६ जागांवर विजय मिळाला असून राष्ट्रवादीला एका जागेवर विजय मिळाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ५ जागांवर विजय मिळाला.