महाराष्ट्रातल्या २९ महानगरपालिकांमधे आज सकाळी साडेआठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. मुंबईत सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत सुमारे १७ पूर्णांक ७३ शतांश टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. काही मतदान केंद्रांवरच्या किरकोळ तक्रारी वगळता मतदान शांततेत सुरु आहे.
राजधानी मुंबईत मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सतर्क आहेत. मुंबईत एकूण १० हजार २३१ मतदान केंद्र असून केंद्रांसभोवतालच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. सकाळी साडेनऊ पर्यंत मतदान सुरू आहे. या निवडणुकीत एकूण सतराशे उमेदवारांचं भवितव्य १ कोटी ३ लाख ४४ हजार ३१५ मतदार ठरवतील. यापैकी ४८ लाख२६हजार५०९ महिला तर १ हजार९९ इतर मतदार आहेत. काही ठिकाणी मतदार यादींचा गोंधळ दिसून येत आहे मतदार यादी मध्ये नावं शोधण्यासाठी मतदारांची धावपळ होत आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच गरोदर महिलांसाठी प्रत्येक केंद्रावर विशेष व्यवस्था आहे.
मुंबईतले केंद्रीय मंत्री पीयुष गोयल, खासदार रविंद्र वायकर, आमदार संजय उपाध्याय, तसंच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, या नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
अभिनेता अक्षय कुमार, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर इत्यादी प्रसिद्ध व्यक्तिमत्वांनी मतदान केलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर महानगरपालिकेसाठी आज सकाळी मतदान केलं. सर्वांनी मतदानाचा हक्क आणि कर्तव्यही बजावावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.