महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सरकारला हव्या त्या सुविधा देण्यासाठी निवडणूक आयोग रोज कायदे बदलत असून, हरलेली बाजी जिंकण्यासाठी निवडणूक आयोग सरकारला मदत करत आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठाकरेही यावेळी उपस्थित होते. प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट अर्थात ‘पाडू’ नावाचं यंत्र या निवडणुकीत वापरणार असल्याचं आयोगानं कोणत्याही राजकीय पक्षाला सांगितलेलं नाही, किंवा दाखवलेलं नाही. यावर उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं.
मतदानाच्या आदल्या दिवशी सायंकाळी ५ वाजेपर्यंत उमेदवार, नेते हे मतदारांना त्यांच्या घरी जाऊन भेटू शकतात, असा बदल निवडणूक आयोगानं केला आहे. ही नवीन पद्धत कुठून आली? असा प्रश्न त्यांनी केला. दरम्यान, याबाबत कुठलाही नवीन आदेश जारी केलेला नाही. त्यासंदर्भातला आदेश जुनाच असून तो १४ फेब्रुवारी २०१२ मध्येच जारी केला होता, असं राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे.
मतदारांना भेटणं हे पूर्णतः नियमात असल्याचं, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही म्हटलं आहे.