राज्यातल्या २९ महापालिका निवडणुकांसाठी उद्या मतदान

राज्यातल्या २९ महापालिका निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार आहे. विविध ठिकाणी मतदान साहित्याचं वाटप आणि कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांवर पोहोचवण्याची तयारी सुरू आहे. 

 

राज्यातल्या २९ महापालिकांसाठी उद्या सकाळी साडेसात ते साडेपाच दरम्यान मतदान होणार आहे. यासाठी निवडणूक आयोगानं दिलेलं मतदार ओळखपत्र मतदारांना दाखवता येईल. याशिवाय छायाचित्र असलेली इतर १२ ओळखपत्र दाखवली तरीसुद्धा मतदान करता येईल. या ओळखपत्रांमध्ये पारपत्र, आधार कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड, सरकारी कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र, निवृत्ती वेतनाची कागदपत्र, लोकप्रतिनिधींची ओळखपत्रं, स्वातंत्र सैनिकांचं ओळखपत्र, बँक आणि टपाल खात्याचे पासबुक, दिव्यांग दाखला, मनरेगाचं जॉब कार्ड, किंवा आरोग्य विमा योजनेचं कार्ड यांचा समावेश आहे. 

 

मुंबई वगळता राज्यातल्या इतर सर्व महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना आहे. बहुतांश प्रभाग हे ४ सदस्यीय असून काही प्रभाग ३ किंवा ५ सदस्यीय आहे. त्याठिकाणी मतदानांना जितक्या सदस्यांचा प्रभाग तितकी मतं द्यावी लागणार आहे. त्यांच्या ईव्हीएमवर ४ वेगवेगळ्या रंगाच्या मतपत्रिका असतील. या प्रत्येक मतपत्रिकेवर त्या त्या क्रमांकाच्या सदस्यपदासाठी उभ्या असलेल्या उमेदवारांची यादी आणि नोटाचे बटन असेल. मतदारांना ईव्हीएममध्ये या सर्व मतपत्रिकांच्या समोर असलेलं बटन दाबावं लागेल. मत नोंदवल्यावर ज्या उमेदवाराला मत दिलं त्याच्या समोरचा लाइट लागेल. सर्व उमेदवारांना मत दिल्यावर शेवटी बीप असा आवाज येईल आणि मतदान पूर्ण झालं याची खात्री मतदारांना मिळेल.