राज्यातल्या २९ महानगरपालिका निवडणुकीसाठीच्या मतमोजणीला आज सकाळी साडे दहा वाजता सुरुवात झाली. सर्व महानगरपालिकांमधे सुरुवातीचे कल समोर येत असून काही ठिकाणी निकाल स्पष्ट झाले आहेत.
मुंबईत दहिसर प्रभाग क्रमांक २ मधून भाजपाच्या तेजस्वी घोसाळकर विजयी झाल्या आहेत. त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या धनश्री कोलगे यांचा पराभव केला.
ठाणे महानगरपालिकेत भाजपाने विजयाचं खातं उघडलं असून त्यांचे चार उमेदवार विजयी झाले आहेत
पनवेल महापालिकेतील ७८ पैकी २२ जागांचे निकाल हाती आले असून १७ ठिकाणी भाजप विजयी झाला आहे. काँग्रेस १, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष १ आणि शेकापने ३ जागांवर विजय संपादन केला आहे.
मीरा भाईंदर महानगरपालिकेत भाजपाच्या आठ उमेदवारांनी विजय मिळवला आहे.
पुण्यात प्रभाग क्रमांक २० मधून भाजपाचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. तर काँग्रेसच्या प्रशांत जगताप हेही विजयी झाले आहेत
कोल्हापूरमधे भाजपा महायुतीच्या सात उमेदवारांनी विजय मिळवला आहे, तर काँग्रेसने दोन जागांवर खातं उघडलं आहे.
सोलापूरमधे आतापर्यंत भाजपा ८ जागांवर विजयी झालं आहे.
मालेगाव महानगरपालिकेत इस्लाम पार्टीचे चार उमेदवार विजयी झाले.
जालन्यामधे भाजपाचे भास्कर दानवे आणि सुशीला दानवे हे विजयी झाले आहेत.
अकोला महानगरपालिकेत भाजपा १४, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एका ठिकाणी आणि वंचित बहुजन आघाडी एका ठिकाणी विजयी झाली आहे.
मतमोजणी प्रक्रियेत पारदर्शकता राहावी यासाठी प्रत्येक मतमोजणी केंद्रावर प्रसारमाध्यम समन्वय कक्ष उभारला आहे. यात एका स्क्रीनवर मतमोजणी कक्षातून थेट प्रक्षेपण दाखवलं जात आहे. तर दुसऱ्या स्क्रीनवर मतमोजणी केंद्रातली आकडेवारी दाखवली जात आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठीची मतमोजणी २३ केंद्रांवर सुरू आहे.