राज्यातल्या २९ महानगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रमुख राजकीय पक्षांच्या हालचाली वेगाने सुरु झाल्या आहेत. राज्यात सत्ताधारी महायुती आणि विरोधकांची महाविकास आघाडी यांच्या घटक पक्षांमधे स्थानिक पातळीवर वेगवेगळी समीकरणं मांडली जात आहेत. उमेदवारांच्या मुलाखतींसाठी दोन्ही आघाड्यांची शिबिरं होत आहेत.
छत्रपती संभाजीनगर, महानगरपालिकेसाठी एआयएमआयएमने ८ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. नाशिक महानगरपालिकेसाठी ३ तर जालन्यासाठी एक उमेदवार पक्षाने दिला आहे. एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली.
नाशिकमधे विविध पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी आज भाजपामधे प्रवेश केला. भाजपा नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपा कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांचं स्वागत केलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विनायक पांडे, आणि यतिन वाघ, मनसेचे दिनकर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नितीन भोसले आणि काँग्रेसचे शाहू खैरे यांचा त्यात समावेश आहे.