आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीतल्या घटक पक्षांमधे चर्चा सुरू असून युती होण्यात कसलीही अडचण नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. अमरावती इथं भाऊसाहेब देशमुख स्मृती पुरस्कार सोहळ्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. जागावाटपाचा तिढा लवकरच सुटेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
त्याआधी देशाचे पहिले कृषीमंत्री पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीदिनी दिला जाणारा भाऊसाहेब देशमुख स्मृती पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला. अमरावतीत आयोजित सोहळ्यात वैज्ञानिक विजय भटकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पंजाबराव देशमुख यांनी शेतीच्या विकासासह शेतकऱ्यांच्या मुलांना उच्चशिक्षण मिळावं यासाठी भरीव काम केलं, राज्य सरकार त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत काम करत आहे, असं मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले. यावेळी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, मंत्री पंकज भोयर उपस्थित होते.