मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागात पावसाचं थैमान अखंड सुरू आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत आज सकाळपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. यामुळे पश्चिम वाहतूक, लोकलसेवा आणि जनजीवन विस्कळीत झालं आहे. आज सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या २४ तासांत विक्रोळीत २५५ मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. भायखळ्यात २४१, सांताक्रूझला २३८पेक्षा जास्त, जुहूला २११, बांद्र्याला २११, कुलाब्याला ११० मिलिमीटरपेक्षा जास्त, तर महालक्ष्मी इथं साडे ७२ मिलिमीटर पाऊस पडला.
मुंबईतली सगळी शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना आज सुटी देण्यात आली आहे. तसंच खासगी कार्यालयं आणि आस्थापनांनी कर्मचाऱ्यांना घरी राहून काम करायच्या सूचना द्याव्यात, असंही मुंबई महानगरपालिकेनं सांगितलं आहे. मुंबईतल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांनाही सुट्टी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड आणि पुणे या जिल्ह्यांना हवामान विभागानं रेड अलर्ट दिला असून सातारा, रत्नागिरी आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.