तरुणाईच्या माध्यमातून समाजात आणि राजकारणात परिवर्तन शक्य असल्याचं सांगत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचे ४० टक्के उमेदवार हे तरुण असतील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत आयोजित I I M U N मुंबई-२०२५ या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी युवावर्गाशी संवाद साधला. यावेळी युवावर्गासाठीच्या अनेक योजना आणि मुंबईतल्या महत्त्वाच्या प्रकल्पांविषयी मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली.
मुंबईत वाहतुकीचं मोठं जाळं तयार करण्यात सरकारला यश आलं असून पुढच्या पाच ते सात वर्षांत मुंबईचा संपूर्ण कायापालट करण्याचं उद्दिष्ट आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सध्या वांद्र ते वर्सोवा सागरी किनारी मार्ग, वर्सोवा ते दहिसर, दहिसर ते भाईंदर मार्गांचं काम सुरू आहे. अटल सेतूला जोडण्यासाठी वरळीपासून शिवडीपर्यंत पूल तयार केला जात आहे. मुंबईतली गर्दी कमी करण्यासाठी पाताललोक म्हणजे भुयारी मार्गांचं मोठं जाळं तयार करण्य़ात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. हे सर्व प्रकल्प २०३२ पर्यंत पूर्ण होतील अशी ग्वाही त्यांनी या कार्यक्रमात दिली. येत्या पाच वर्षात मुंबई महानगर क्षेत्रातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल दिसतील. विशेषतः मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणारी उपनगरीय रेल्वे ही कोणतीही भाडेवाढ न करता संपूर्णपणे वातानुकूलित आणि बंद डब्यांची केली जाणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री इंटर्नशीप योजनेमुळे अनेक तरुणांना रोजगार मिळण्यासाठी मदत झाली, ही योजना राज्यात यशस्वी झाली , त्यामुळे इतर राज्यं सुद्धा ही योजना राबवत आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.
गुन्हा दाखल असलेल्यांना निवडणुकीत उमेदवारी मिळण्याबद्दल फडनवीस यांनी यावेळी स्पष्टीकरण दिलं. राजकारणात समाजाचं प्रतिबिंब पडत असतं, त्यामुळे काही जण गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत मात्र प्रत्येक जण तसाच आहे असं म्हणणं चुकीचं आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. जोपर्यं चांगले नागरिक राजकारणात येणार नाहीत तोपर्यंत वाईट प्रवृत्तीचे लोक बाहेर पडणार नाहीत असंही फडनवीस म्हणाले.