मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांची तयारी वेगात सुरू झाली असून राज्य निवडणूक आयोगानं आरक्षण निश्चिती आणि सोडत कार्यक्रमाचं सविस्तर वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार, निवडणुकीसाठी ११ नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत काढली जाईल. १४ नोव्हेंबर रोजी आरक्षणाचं प्रारूप जाहीर झाल्यावर नागरिकांना आपल्या हरकती- सूचना नोंदविण्याची संधी मिळेल. २० नोव्हेंबरपर्यंत या हरकती स्वीकारल्या जातील. त्यानंतर सर्व हरकतींचा विचार करून पालिका आयुक्त अंतिम निर्णय घेतील आणि आयोगाची मान्यता घेऊन अंतिम आरक्षण २८ नोव्हेंबर रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध होईल.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार ही संपूर्ण प्रक्रिया निश्चित वेळापत्रकानुसार पूर्ण करणं बंधनकारक आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका जानेवारी २०२६ पूर्वी घेण्यात येतील, हे आता स्पष्ट झालं आहे.