मुंबई उपनगरीय रेल्वेत २००६ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी सर्व १२ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाला आज सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली. मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, त्यावर आज न्यायमूर्ती एम.एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती एन.के. सिंह यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. राज्य सरकारच्या वतीनं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयात म्हणणं मांडलं. उच्च न्यायालयाच्या निकालातल्या काही निरीक्षणांमुळे मकोका अंतर्गत प्रलंबित असलेल्या इतर खटल्यांवर परिणाम होऊ शकतो, म्हणून या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी राज्यसरकारची मागणी त्यांनी न्यायालयासमोर मांडली. मात्र उच्च न्यायालयाच्या निकालानंतर तुरुंगातून सुटलेल्या आरोपींनी पुन्हा आत्मसमर्पण करावं अशी कोणतीही मागणी नसल्याचं त्यांनी न्यायालयात स्पष्ट केलं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थिगिती दिली. तसंच, या सर्व आरोपींना पुन्हा तुरुंगात ठेवण्याची आवश्यकता नाही असं स्पष्ट केलं.
Site Admin | July 24, 2025 1:11 PM | Mumbai Local Blast | mumbai local train
मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपींची निर्दोष सोडण्याच्या निर्णयाला SC ची स्थगिती
