मुंबई-गोवा महामार्गावर निवळी घाटात अपघातात ३१ जण जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर आज सकाळी रत्नागिरी जिल्ह्यातल्या निवळी घाटात बावनदीजवळ, मिनी बस आणि एलपीजी वाहतूक करणारा टँकर यांची धडक होऊन अपघात झाला आणि मिनी बस रस्त्याच्या कडेला दरीत कोसळली. ही मिनी बस, शिक्षकांना प्रशिक्षणासाठी रत्नागिरीला घेऊन येत होती. बसमधले ३१ जण जखमी झाले असून, त्यांच्यावर रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. यातल्या दोन महिलांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे. 

 

अपघातग्रस्त टँकरमधून एलपीजीची गळती होत असल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांनी बावनदी भागात येऊ नये. पाली आणि संगमेश्वर इथून पर्यायी मार्गांचा वापर करावा असं आवाहन, रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी  केलं आहे. वायुगळती होत असल्यानं,  त्या भागातली वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. महामार्गाजवळची घरं, बागायत, गोठा आणि वाहनं यांचंही या अपघातात नुकसान झालं. त्यात काही जनावरं जखमी झाली आहेत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.