महानगरपालिका निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपाचं अभिनंदन केलं. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधे पक्षाचा पराभव झाल्यानंतर ते आज पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते. निवडणूक निकालाचं पक्षाचे नेते एकत्र बसून विश्लेषण करतील असं पवार म्हणाले. प्रत्येक पक्ष मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतो, भाजपाने यात लक्षणीय यश मिळवलं आहे, असं पवार म्हणाले.
त्याआधी बारामती इथं उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. त्यानंतर शऱद पवार यांच्या निवासस्थानी दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. यात सुप्रिया सुळे, रोहित पवार, शशिकांत शिंदे, दत्तात्रय भरणे उपस्थित होते. दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी जिल्हा परिषदा एकत्र लढवतील या शशिकांत शिंदे यांच्या वक्तव्याबद्दल विचारलं असता याबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही असं अजित पवार म्हणाले. आघाडी करण्याचे अधिकारी स्थानिक पातळीवरल्या नेत्यांना दिल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, निवडणुकीतल्या पराभवाचं आपल्याला आत्मचिंतन करणं गरजेचं आहे, असं खासदार सुप्रिया सुळे बारामतीत वार्ताहरांशी बोलताना म्हणाल्या. मुंबईत ठाकरे बंधूंनी चांगली लढत दिली, मात्र त्यांनी काँग्रेसशी आघाडी केली असती तर अधिक चांगले निकाल आले असते असं त्या म्हणाल्या.