राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनअंतर्गत एम एस एम ई अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील संधी शोधण्यासाठी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयातर्फे आज नवी दिल्लीमधील अटल अक्षय ऊर्जा भवन इथं विशेष कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यशाळेमध्ये शाश्वत हायड्रोजन आधारित अर्थव्यवस्थेला आकार देण्यासाठी एमएसएमईच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा विचार केला जाणार आहे.
या उदयोन्मुख क्षेत्रात नावीन्य आणि विकासाला गती देण्यासाठी एमएसएमईचे घटक महत्त्वपूर्ण ठरणार असून उपकरणे विकसित करण्यासाठी तंत्रज्ञान सहकार्य, हरित हायड्रोजन पुरवठा साखळीतील संधी, बायोमास मार्गांचा वापर करून विकेंद्रित हायड्रोजन उत्पादन आणि मूल्य साखळीतील गुंतवणुकीस उत्तेजन देण्याची रणनीती या प्रमुख विषयांचा ऊहापोह यामध्ये केला जाणार आहे.