स्टारलिंक सॅटेलाईट कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड आणि महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभाग यांच्यात आज सामंजस्य करार झाला. या करारामुळे राज्यातल्या दुर्गम भागापर्यंत इंटरनेट सेवा पोहोचवणं सुलभ होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. स्टारलिंक महाराष्ट्राशी भागीदारी करत असल्याने डिजीटल दरी मिटणार आहे. प्रत्येक शाळा, आरोग्य केंद्र आणि गाव आता डिजिटल संपर्कात येणार आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. स्टारलिंकशी करार करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे.
या धोरणात्मक भागीदारीअंतर्गत अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने महाराष्ट्र शासन आणि स्टारलिंक मिळून राज्यातील दुर्गम आणि अल्पसेवित भागांना जोडण्यासाठी कार्य करतील. यात आदिवासी शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, आपत्ती नियंत्रण कक्ष, वन चौक्या, किनारी क्षेत्र, तसंच गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव आणि वाशिम या जिल्ह्यांचा समावेश आहे.
या उपक्रमाचा उद्देश राज्यातल्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा मार्गांवर उपग्रहाधारित जोडणी उपलब्ध करून देणं आहे. तसंच शिक्षण आणि टेलिमेडिसिन क्षेत्रातही स्मार्ट कनेक्टिव्हिटीचा लाभ देण्याची योजना आहे.
महाराष्ट्र-स्टारलिंक सहकार्यामुळे ‘डिजिटल महाराष्ट्र’ या मिशनला अधिक गती मिळणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.