भगवान श्री राम यांच्या आगमनाचा सोहळा साजरा करण्यासाठी उत्तरप्रदेशात शरयू नदीच्या किनाऱ्यावर आज संध्याकाळी भव्य दीपोत्सव साजरा होत असून, यासाठी अयोध्या नगरी सजली आहे. राम की पौडी इथल्या ५६ घाटांवर आज २६ लाखांपेक्षा जास्त दिवे प्रज्वलित केले जातील. या दिव्यांच्या प्रकाशात अयोध्या नगरीची अध्यात्मिक आणि सांस्कृतिक प्रतिमा जागतिक व्यासपीठावर उजळून निघेल. आज संध्याकाळी स्थानिक प्रशासनानं आयोजित केलेली भव्य शरयू आरती या कार्यक्रमाच्या दिमाखात आणखी भर घालेल.
दरम्यान, काल दिल्लीत प्रथमच अयोध्येच्या धर्तीवर दीपोत्सव साजरा करण्यात आला. कर्तव्यपथावर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी या उत्सवाचं उद्घाटन केलं. हा केवळ दीपोत्सव नाही, तर एका नव्या जाणिवेचा उत्सव असल्याचं त्या म्हणाल्या. हा दीपोत्सव म्हणजे आस्था आणि आधुनिकतेचा संगम असल्याचंही त्यांनी सांगितलं. या दीपोत्सवात दीड लाखापेक्षा जास्त दिवे प्रज्वलित करण्यात आले.