लोकसभेच्या सभागृहाचं कामकाज आज सुरु झाल्यावर विरोधकांनी बिहार मतदार याद्यांच्या विशेष पुनरिक्षणाच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी केली होती. प्रश्नोत्तरांच्या तासात विरोधकांच्या घोषणा सुरु झाल्यामुळे सभापती ओम बिर्ला यांनी प्रथम दुपारी १२ वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी ३ वाजेपर्यंत सभागृह तहकूब केलं.
गोंधळ सुरु असतानाच ग्रामीण विकास राज्यमंत्री चंद्रशेखर पेमसेनी यांनी ‘प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण’ अंतर्गत सुरु असलेल्या घरांच्या बांधकामाबद्दलच्या प्रश्नाला उत्तर दिलं. केंद्र सरकारने या योजनेअंतर्गत ४ कोटी १२ लाख घरांच्या बांधकामाला मंजुरी दिली असून आतापर्यंत त्यातल्या २ कोटी ९० लाख घरांचं बांधकाम पूर्ण झाल्याचं त्यांनी सांगितलं.
राज्यसभेतही बिहार मतदार याद्यांच्या पुनरिक्षणाचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला होता. न्यायप्रविष्ट मुद्द्यांवर सदनात चर्चा करता येणार नाही अशी भूमिका घेत उपाध्यक्ष हरिवंश यांनी विरोधी पक्षांच्या सदस्यांना शांत राहण्याची विनंती केली. परंतु घोषणा आणि गोंधळ सुरूच राहिल्यामुळे त्यांनी सभागृह दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केलं आहे.