बिहार मधल्या मतदारयाद्यांच्या पुनरीक्षण मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केलेल्या गदारोळानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं.
लोकसभेचं कामकाज सुरु होताच काँग्रेस, द्रमुक, तृणमूल काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरु केली. सभापती ओम बिर्ला यांनी या गदारोळात प्रश्नोत्तरांचा तास सुरु करण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी सभागृहात चर्चा होऊ न देणे ही संसदेच्या प्रतिष्ठेला मारक बाब आहे, असंही ते म्हणाले. मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज स्थगित करण्यात आलं. तत्पूर्वी सदनात दिवंगत माजी संसद सदस्य तिलकधारी प्रसाद सिंह, रामरति बिंद आणि शिबू सोरेन यांना आदरांजली वाहण्यात आली.
राज्यसभेतही याच मुद्द्यावरून विरोधकांनी गदारोळ केला. उपाध्यक्ष हरिवंश यांनी सदनाच्या कामकाजात सतत अडथळे येत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. विरोधकांच्या गदारोळामुळे या अधिवेशन सत्रात आतापर्यंत ४१ तास ११ मिनिटांचा वेळ वाया गेला, असं हरिवंश यांनी सांगितलं.
शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारनं गेल्या ११ वर्षात अनेक उपाय योजना केल्या आहेत, असं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज लोकसभेत सांगितलं. चौहान एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देत होते. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत सुमारे ४ लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.