भारताच्या सशस्त्र दलांनी एकीकडे ऑपरेशन सिंदूरद्वारे दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांना जमीनदोस्त केलं, तर दुसरीकडे लष्कर आणि सशस्त्र दलांनी ऑपरेशन महादेवद्वारे पहलगाममध्ये निरपराध पर्यटकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना संपवलं, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत सांगितलं. ऑपरेशन सिंदूरवर लोकसभेत काल सुरू झालेल्या चर्चेत त्यांनी आज भाग घेतला.
ऑपरेशन महादेव अंतर्गत काल काश्मीरमध्ये मारले गेलेले तीन दहशतवादी, सुलेमान, अफगाण आणि जिब्रान, हे लष्कर ए तैयबाचे अ श्रेणीचे कमांडर असून पहलगाम हल्ल्यात सामील असल्याचे ठोस पुरावे तपास यंत्रणांकडे असल्याचा दावा त्यांनी केला. सशस्त्र दलांच्या या कामगिरीवर संपूर्ण देशाला अभिमान आहे, मात्र विरोधी पक्षांना मात्र याचा आनंद झालेला नाही, अशी टीका त्यांनी केली.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून ते ऑपरेशन सिंदूरपर्यंत झालेल्या घडामोडींची तपशीलवार माहिती त्यांनी सदनाला दिली. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानात १०० किलोमीटर आत घुसून नियंत्रित हल्ल्याद्वारे ९ दहशतवादी तळ भारतानं लक्ष्य केले, यात एकही सामान्य नागरिक ठार झाला नाही, मात्र १००पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले, यात जैश-ए-मोहम्मदच्या अनेक महत्त्वाच्या दहशतवाद्यांचाही समावेश होता, असा दावाही शहा यांनी केला. युद्ध का थांबवलं, असा प्रश्न विरोधकांनी विचारला, मात्र युद्धाचे गंभीर परिणाम असतात, असं मत शहा यांनी मांडलं.