संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षांनी विविध मुद्द्यांवर गदारोळ केल्यामुळं लोकसभेचं कामकाज आधी बारा, नंतर एक आणि त्यानंतर दोन वाजेपर्यंत तहकूब झालं. राज्यसभेतही याच कारणामुळे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब झालं.
लोकसभेत दुसऱ्यांदा कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांनी हौद्यात उतरून वेगवेगळ्या मुद्द्यांवर घोषणाबाजी सुरू केली. लोकसभा सभापती ओम बिर्ला यानी विरोधी पक्षाच्या सदस्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं, तसंच समज दिली. मात्र घोषणाबाजी न थांबल्यामुळे सभापतींनी सभागृहाचं कामकाज दुपारी एक वाजेपर्यंत तसंच नंतर दोन वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं.
दरम्यान, आज सभागृहात ऑपरेशन सिंदूरविषयी चर्चा होणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या चर्चेला सुरुवात करतील.
राज्यसभेचं कामकाज घोषणाबाजीनंतर दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब झालं. त्याआधी अण्णा द्रमुकचे एम धनपाल आणि आय एस इंबदुराई यांनी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.