संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगानं इंडिया आघाडीच्या नेत्यांची काल दूरस्थ पद्धतीनं बैठक झाली. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, द्रमुक, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष इत्यादी पक्षांचे नेते यामध्ये सहभागी झाले होते.
या बैठकीला उपस्थित असलेल्या प्रमुख नेत्यांमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सपाचे रामगोपाल यादव आणि द्रमुकच्या तिरुची शिवा यांचा समावेश होता. अधिवेशनात पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर सारखे मुद्दे उपस्थित करण्यावर सर्व नेत्यांची सहमती झाल्याचं काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
दरम्यान, आम आदमी पक्ष, इंडिया आघाडीमधून बाहेर पडला असल्यानं या बैठकीत सहभाग घेतला नाही. ही आघाडी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आली होती, त्यानंतर आम आदमी पक्षानं हरियाणा आणि दिल्ली विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवली, अशी माहिती आपचे नेते संजय सिंह यांनी काल माध्यमांना दिली.